Amruta Bane Shubhankar Ekbote Konkan Vlog: अभिनेत्री अमृता बने आणि अभिनेता शुभंकर एकबोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. अलीकडेच अभिनेत्रीने कोकणातून एक खास व्लॉग शेअर केला आहे.
मुंबई: ‘माझ्या घोवाला कोकण दाखवा’… असं म्हणत अभिनेत्री अमृता बने कोकणात पोहोचली आहे. तिचा नवरा आणि अभिनेता शुभंकर एकबोटेसह यंदाच्या गणेशोत्सवानिमित्ताने ती रत्नागिरीत गेली होती. या प्रवासाचा सुंदर व्लॉग अमृताने सोशल मीडियावर शेअर केला. अभिनेत्रीच्या या मिनी व्लॉगवर असंख्य कमेंट आल्या असून, रत्नागिरीतील तिचं गाव फारच सुंदर असल्याचं चाहते म्हणत आहेत.
‘कन्यादान’ मालिकेत नवरा-बायको म्हणून झळकलेल्या शुभंकर आणि अमृता यांनी खऱ्या आयुष्यातही 2024 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर प्रत्येक सण या जोडीने थाटामाटात साजरा केला. आता गणेशोत्सवातही त्यांच्या पुण्यातील घरी बाप्पा विराजमान झाले होते. त्यानंतर हे जोडपे अभिनेत्रीच्या कोकणातील गावी म्हणजे रत्नागिरितील निरुळ याठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोहोचले. रत्नागिरीत पोहोचल्यापासून ते जावयाच्या मानपानापर्यंत सर्वकाही अमृताने या व्लॉगमध्ये शेअर केले आहे. तिने म्हटले की, ‘एक हार्डकोअर पुणेकर ते मुंबईचा जावई, हे तर तो अनुभवतो आहे. पण त्याच्या बायकोचं म्हणजे माझं मूळ कोकणात- रत्नागिरीत असल्यामुळे, रत्नागिरीच्या जावयाचा मान कसा असतो, ते जर शुभंकरला नाही दाखवलं आणि कोकण नाही फिरवलं तर काय उपयोग? असं म्हणतात की, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ यावी लागते आणि माझ्या घोवाला कोकण फिरवण्यासाठी काय वेळ यावी- ती म्हणजे गणपती!’
केदार शिंदेच्या घरच्या बाप्पाच्या मूर्तींचा आणि दगिन्यांचा अनोखा इतिहास
अमृताने पुढे म्हटले की, ‘घरच्या बाप्पाला टाइमप्लीज करुन आम्ही निघालो कोकणात…’ रत्नागिरीमध्ये बस स्टँडवर पोहोचल्यानंतर खाल्लेली मिसळ ते बालपणीच्या आठवणी असं सर्वकाही तिने या व्लॉगमध्ये सांगितले. ती म्हणाली की, ‘रत्नागिरीहून गावाला निरुळला जाताना, कधी एकदा वाटेत भाट्येचा समुद्र दिसतोय असं लहानपणी व्हायचं… ही आठवण आवर्जुन शुभकंरला सांगितली. गावच्या घरी पोहोचेपर्यंत पाऊस असल्याने, जिकडे नजर जाईल तिकडे स्वर्गच दिसत होता.’
View this post on Instagram
अभिनेत्रीने या व्लॉगमध्ये असे म्हटले की, कोकणात गौरींच्या आगमनाचा उत्साह काय असतो हे यावेळी शुभंकरने अनुभवले. या कोकण दौऱ्याचा आणखीही व्लॉग शेअर करणार असल्याचे अभिनेत्रीने सांगितले.