Authored by: मंदार गुरव|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Sept 2025, 10:58 pm
Ganesh visarjan Konkan Video: गणपती विसर्जनावेळी कोकणातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात, भक्तगण बाप्पाच्या मूर्ती घेऊन नदीकडे जात असताना, एक मोर त्यांच्या वाटेत नाचायला लागला. अनेकांनी हा ‘चमत्कार’ असल्याचे मानले असून, “बाप्पाला परत नेण्यासाठी कार्तिकेयनं वाहन पाठवलं,” अशी भावना व्यक्त केली आहे.
गणपती बाप्पा येऊन गेलेले १० दिवस कधी उलटले, कळलंच नाही. आता बाप्पा स्वतःच्या गावाला निघाले आहेत. आणि भक्तजण डोक्यावर बाप्पाच्या मूर्त्या घेऊन नदीवर विसर्जनासाठी जात आहेत. असे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोंकणातील गणेश विसर्जनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये विसर्जन सुरू असताना चक्क मोरानं वाट अडवली. लोक म्हणत आहेत, बाप्पा घरी चालले हे पाहून मोराला सुद्धा रावलं नाही, म्हणून बाप्पाला निरोप देण्यासाठी त्यानं भक्तजणांची वाट अडवली. हा व्हिडीओ पाहून खरंच तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.(फोटो सौजन्य – beingkokani_/Instagram)
हा व्हिडीओ beingkokani_ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की अख्खं गाव एकत्र गणपती विसर्जनासाठी निघालं आहे. सर्वांच्या डोक्यावर बाप्पाची मूर्ती आहे. लक्षवेधी बाब म्हणजे लहान मुलींच्याही डोक्यावर बाप्पाची मूर्ती दिसतेय. सर्वजण बाप्पाचा जयघोष करत नदीवर विसर्जनासाठी जात असताना मध्येच एक मोर आला. दोन मिनिटं जागेवर तो गोलगोल फिरला आणि मग उडून गेला. दरम्यान, लोकांनी या मोराकडे नाचून दाखवण्याची विनंती सुद्धा केली.(फोटो सौजन्य – beingkokani_/Instagram)
View this post on Instagram
हा व्हिडीओ २५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी मोराला म्हणतंय, “माझ्या घरावर येऊन डान्स कर,” तर कोणी मोराच्या गणेश भक्तीचं कौतुक करतंय. काहींच्या मते, असे चमत्कार फक्त कोंकणातच पाहायला मिळतात. तर काही जण म्हणत आहेत, “कार्तिकेयनं बाप्पाला परत येण्यासाठी वाहन पाठवलं.” असो, हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या.