आपल्याकडे इतकं सोनं आहे की हवं तर आपण सोन्याची लंकाही बांधू शकू. बहुतेक सोनं आपल्याला पिढ्यांपिढ्या हस्तांतरित होत राहतात. याव्यतिरिक्त आपल्याकडे लग्नानिमित्त देखील सोन्याची भेट देण्याची परंपरा आहे तर, शतकानुशतके महिला देखील सणासुदीच्या निमीत्त सोन्याची नाणी, बिस्किटे किंवा दागिने खरेदी करत आल्या आहेत. अशा प्रकारे, भारतीय कुटुंबांकडे अंदाजे 25,000 टन म्हणजे अंदाजे 22,679,618 किलो सोनं असल्याचा अंदाज आहे.
भारतीय कुटुंबाच्या तिजोरी, बँक लॉकर आणि कपाटात ठेवलेलं हे सोनं अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशियाच्या एकत्रित सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त आहे. अमेरिकेकडे 8,133 टन, जर्मनीकडे 3,355 टन आणि भारताकडे अधिकृतपणे फक्त 800 टन सोन्याचा साठा आहे.
भारतातील कुटुंबे फक्त पैसे वापरत नाहीत तर जगातील सर्वात मोठे अप्रयुक्त आर्थिक संसाधने साठवतात. पण, हा सोन्याचा भंडार कधी लोकांच्या लॉकरमधून बाहेर पडून अर्थव्यवस्थेत येईल का? (Representational)
जागतिक सुवर्ण परिषद किंवा WGC आणि तज्ञांच्या अंदाजानुसार भारतीय घरे आणि मंदिरांमध्ये अंदाजे 25,000 टन सोन्याचा भंडार जमा आहे, ज्याची किंमत अंदाजे $2.3-2.4 ट्रिलियन पेक्षा जास्त असू शकते. म्हणजे आपल्याकडील सोन्याचा भंडार पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या अंदाजे सहा पट आणि अनेक विकसित देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे.
दरम्यान, अलीकडच्या काही महिन्यांमध्ये सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर उसळला होता तरीही, भारतीय कुटुंबांनी घरात पडून असलेलं सोनं विकण्यात रस दाखवला नाही. रॉयटर्सच्या एका अहवालानुसार देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर आहेत. तरीही, लोक त्यांचे सोने विकत नसून किंमत आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
भारतीय कुटुंबांमध्ये सोन्याचं आकर्षण केवळ संस्कृती आणि परंपरेत रुजलेले नाही. सध्या अख्खं जग महागाई, Trade War आणि भू-राजकीय संघर्षांशी झुंज देत असून अशाप्रकारच्या अनिश्चिततेविरुद्ध सोने मौल्यवान बफर देते. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते कारण बाजारात अस्थिरता असताना गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात, जी चिंतेची पातळी दर्शवते आणि महागाईपासून बचावही करते.
कागदी चलनापेक्षा सोन्याचे मूल्य दशकांपर्यंत टिकून राहते, कुटुंबांना आर्थिक धक्क्यांपासून वाचवते. सोन्यावर कर्जही मिळते, कुटुंबे त्यांचे दागिने गहाण ठेवून पैसे उधार घेऊ शकतात. मुंबईतील एका सराफा व्यापाऱ्याने सांगितले की, भारतात सोने केवळ शोभेचे नाही तर, आर्थिक सुरक्षिततेचे जाळे आहे.
तुम्हाला माहिती आहे का जगात सर्वात जास्त सोने कोणाकडे आहे? याचं उत्तर आहे सौदी राजघराणे. ‘ग्लोबल बुलियन सप्लायर’च्या अहवालानुसार, सौदी राजघराण्याने 1920 च्या दशकात तेलाच्या नफ्यातून मुबलक प्रमाणात सोने खरेदी केले होते आणि आता त्यांच्याकडे शेकडो टन सोने आहे. पण, त्यांच्या मालकीच्या सोन्याचा आकडा सांगितला नाही.