Skip to content

  • Latest Marathi News
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact

माथेरानमध्ये घोड्यांना अंधत्वसदृश लक्षणं? सध्या काय आहे परिस्थिती?

माथेरानमध्ये घोड्यांना अंधत्वसदृश लक्षणं? सध्या काय आहे परिस्थिती?

माथेरानमध्ये घोड्यांना अंधत्वसदृश लक्षणं?

फोटो स्रोत, डाॅ. अनिल लहाने

Article Information
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • 11 मिनिटांपूर्वी

मुंबईपासून साधारण 86 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध अशा ‘माथेरान हिल स्टेशन’वरील काही घोड्यांना डोळ्यांमध्ये संसर्ग झाल्याची चर्चा सुरू आहे. तर यापैकी दोन घोड्यांना अंधत्व आल्याचंही समोर आलं होतं.

यासंदर्भात खासगी डॉक्टर तसंच पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाकडूनही घोड्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

अंधत्व आलेल्या घोड्यांमध्ये उपचारानंतर दृष्टी आल्याचंही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं असून यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

तर उर्वरित सर्व 450 घोड्यांचं स्क्रिनिंग येत्या काही दिवसांत केलं जाणार आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊया.

‘घोड्यांच्या डोळ्यांबाबत यापूर्वी असा अनुभव कधीही आला नाही’

नेरळ रेल्वेस्थानकापासून 7.6 किलोमीटरवर असलेलं आणि सुमारे 800 मीटर उंचीवर असलेलं मुंबईजवळील माथेरान हिल स्टेशन हे देशातील एक थंड हवेचं पर्यटन स्थळ आहे.

Skip सर्वाधिक वाचलेले and continue reading
सर्वाधिक वाचलेले
  • भारतात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानात सैंधव मीठ सापडतं
    सैंधव मिठाचा हृदय आणि मेंदूवर काय परिणाम होतो?
  • लघवीमध्ये फेस दिसतोय? मग किडनीच्या आरोग्याबद्दलची ही माहिती वाचा
    लघवीमध्ये फेस दिसणं किती धोकादायक? किडनीत दोष असल्याची 5 लक्षणं कोणती?
  • ब्रेन फॉग
    ब्रेन फॉगचा त्रास होतोय? या सोप्या टिप्स तुम्हाला मदत करतील
  • 'नोरमा' ही एका अशा महिलेची कहाणी आहे जिच्या पतीचे अनैतिक संबंध तिच्या आईबरोबरच आहेत आणि त्याचा परिणाम नोरमाच्या आयुष्यावर होतो
    सासू आणि जावयाच्या प्रेमसंबंधांवर बनलेला चित्रपट इंडोनेशियात प्रचंड हिट का झाला?

End of सर्वाधिक वाचलेले

याठिकाणी पोहचण्यासाठी नेरळ रेल्वेस्टेशनपासून टॉय ट्रेन किंवा मग काही अंतरापासून घोड्यावर बसून जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

माथेरान हिल स्टेशनवर बहुतांश पर्यटक हे घोड्यावर बसून फिरणं पसंत करतात. इथे सुमारे 450-500 कुटुंबाचा उदारनिर्वाह यावर सुरू आहे.

सुमारे 700 घोडे हिल स्टेशनवर असून यापैकी जवळपास 400 घोडे हे पर्यटकांसाठी तर उर्वरित घोडे हे मालवाहतुकीसाठी वापरले जातात.

जन्मापासून माथेरानमध्येच राहणाऱ्या निधी जाधव यांच्याकडे चार घोडे आहेत. त्या स्वत: अश्वपाल संघटनेच्या सदस्य असल्याचेही सांगतात.

घोड्यांची दृष्टी जाणं किंवा त्यांनी दृष्टी कमी होणं याबाबत नेमकं काय घडलं यावर बोलताना त्यांनी त्यांच्या शेजाऱ्याच्या घोड्यामध्ये आम्हाला डोळ्यांसंदर्भात काही लक्षणं दिसून आल्याचं सांगितलं.

पूर्वी अशाप्रकारे घोड्यांच्या डोळ्यांबाबत कधीही असा अनुभव आला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

माथेरानमध्ये घोड्यांना अंधत्वसदृश लक्षणं?

फोटो स्रोत, निधी जाधव, अश्वपालक

बीबीसी मराठीशी बोलताना निधी जाधव यांनी सांगितलं, “संसर्ग झाल्याने समस्या येत होत्या. काही दिवसांपूर्वी घोड्यांमध्ये डोळ्यांना सूज येत होती. डोळे लालसर आणि पिवळसर दिसत होते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे दिसत होतं. अंधत्व आल्याचंही दिसलं आम्हाला. घोड्यांच्या चालण्यावरून आम्हाला लक्षात आलं. घोडे ग्राहकांना घ्यायला जातात. घोडे वाट चुकू लागले किंवा पाय वेगळीकडे टाकत होते. घोडे भरकटत असल्याचं दिसलं. मोजून आठ ते दहा घोड्यांमध्ये आम्हाला हे दिसलं. आम्ही डॉक्टरांना बोलवलं. त्यांनी उपचार सुरू केले आणि बाकी घोड्यांमध्येही आम्ही उपचाराला सुरुवात केली.”

“संसर्ग किंवा जळजळ यामुळे होऊ शकतं असं आम्हाला सांगितलं. इतर घोड्यांसाठीही आम्ही खबरदारी घेण्यास सुरुवात केली. यामुळे यात लवकर उपचार घेतल्याने घोड्यांचे डोळे आता बरे होत आहेत. इथे डॉक्टर नव्हते. आम्ही बाहेरून डॉक्टर बोलवले. सात दिवसांचा उपचाराचा कोर्स होता. यात 80 टक्के रकव्हरी झाल्याचं दिसत होतं.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

माथेरानमध्ये घोड्यांना अंधत्वसदृश लक्षणं?

फोटो स्रोत, डाॅ. श्याम कदम, सहाय्यक उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, कर्जत

अर्थात याचा काही दिवस धंद्यावर परिणाम झाल्याचंही त्यांनी सांगितलं. “याठिकाणी 40 ते 50 टक्के लोकांची घरं ही घोड्यांवर चालतात. यामुळे घोडा आजारी असेल तर परिणाम होतो. दिवसाला साधारण हजार रुपयांचा परिणाम होतो. दृष्टी कमी झाली म्हणून घोडे मालकांनाही घाबरल्यासारखं झालं होतं,”

तुषार आखाडे यांचाही जन्म माथेरानमधलाच. गेल्या तीन पिढ्यांपासून त्यांच्या घरी घोड्यांचाच व्यवसाय केला जातो. त्यांच्याकडे सात वर्षांचा संजीव नावाचा घोडा आहे. आता तो बरा झाला आहे असं तुषार यांनी सांगितलं.

“इथे दोन अडीच महिन्यापासून पाऊस कोसळतो आहे. घोडे थोडे कमकुवत झाले असावेत. काही मोजक्याच घोड्यांना आंधुक दिसत होतं. पण ते आता बरे झाले आहेत. त्यांच्या डोळ्यांना कॅल्शियम वगैरे कमी असेल,” असं ते सांगतात.

परंतु माथेरानमध्ये वरती हिल स्टेशनवरती घोड्यांसाठी हॉस्पिटल आहे परंतु डॉक्टर नाही ही आमची प्रमुख समस्या असल्याचं ते सांगतात.

माथेरानमध्ये घोड्यांना अंधत्वसदृश लक्षणं?

फोटो स्रोत, डाॅ. अनिल लहाने

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पुण्यातील अश्वसेवा संस्थेचे डॉ. अनिल लहाने आणि त्यांच्या टीमनेही काही दिवसांपूर्वी माथेरानमध्ये घोड्यांची तपासणी केली. आपण गेलो होतो त्यावेळी दहा ते अकरा घोड्यांना संसर्ग झाला होता असं ते सांगतात.

डॉ. लहाने यांनी सांगितलं, “मला एका अश्वपालकाने फोन केला होता. आधी फोन आला की एका डोळ्याने घोड्याला अंधत्व आलं आहे. मग फोन आला की दुसऱ्या डोळ्यालाही झालं आहे. मग दुसऱ्या घोड्यासाठीही फोन आला. त्यांना ब्लड पॅरासाईट असतात किंवा विषाणू, जीवाणूंचा संसर्ग असू शकतं. त्यांच्यावर एका उपचार सुरू केला.

“आम्ही 16 सप्टेंबरला टीमसह जाऊन तपासणी केली. घोड्यांचे डोळे खूपच खराब होते. उपचारानंतर रिकव्हरी सुरू झाली होती. अंधत्व आलं तर आपणही घाबरून जातो. त्यांचे अॅड्रिनलिन अनेक पटींने वाढले होते. हे घोडे खूप दचकले होते. अश्वपालकांच्या अंगावरही ते धावून जाऊ लागले. मी त्यांना सांगितलं की घोडे बाहेर बांधा. हात पकडून चालवत असेल तर दिलासा मिळतो,” डॉ. लहाने सांगतात.

रक्ताचे नमुने घेऊन आलो होतो. चार घोड्यांचे नमुने घेतले आहोत. मुंबई पशुवैद्यकीय कॉलेजमध्येही रक्ताचे नमुने पाठवण्यात आले आहेत.

“सरकारी प्रशिक्षणात गायी, म्हशी जास्त असतात. यामुळे घोड्यांच्या उपचाराच्याबाबतीत अडचण होते. माथेरान, महाबळेश्वरमध्ये डॉक्टर्स आहे. घोड्यांचे रोग माणसाला येऊ शकतात. माणसाचे घोड्यालाही येऊ शकतात. वेळीच उपचार आणि नियंत्रणात आणणं गरजेचं आहे. अंधत्वाचा प्रकार माणसांना सुरू झाला तर काय करणार?” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

“माशा, पक्ष्यांमुळे, किंवा दूषित पाण्यामुळे हे सुद्धा कारण असू शकतं,” असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.

सरकारी डॉक्टरांच्या पथकाला काय आढळलं?

कर्जत येथील पशुसंवर्धन विभागाच्या तीन डॉक्टरांची टीम माथेरान येथे गेल्या आठ दिवसांपासून दररोज उपलब्ध असल्याचं सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

पशुसंवर्धन विभाग कर्जतचे उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी सांगितलं, “दोन घोड्यांवर उपचार झालेले आहेत, त्यांच्यात अंधत्वाची लक्षणं दिसत होती. लक्षणानुरुप आम्ही त्यांच्यावर उपचार केले आहेत. काहीही गंभीर गोष्ट लक्षात आलेली नाहीये. गेल्या आठ दिवसांपासून आम्ही तपासणी करत आहोत. काही लक्षणं दिसली तर ते तपासण्यासाठी आम्ही स्क्रिनिंग सुरू करतो.”

“निदान होईपर्यंत काही म्हणता येणार नाही. जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत ठोस वैद्यकीय टर्म सांगता येणार नाही. परंतु अंधत्वासारखी लक्षणं म्हणू शकतो.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर पशुसंवर्धन विभागाचे (कर्जत) सहाय्यक आयुक्त श्याम कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. तसंच आतापर्यंत 20 घोड्यांची तपासणी केली असून यापैकी दोन घोड्यांमध्येच अंधत्वासारखी लक्षणे आढळूण आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढच्या दोन दिवसांत माथेरानच्या सर्व घोड्यांची तपासणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कर्जत येथील पशुसंवर्धन विभागाच्या तीन डॉक्टरांची टीम माथेरान येथे गेल्या आठ दिवसांपासून दररोज उपलब्ध असल्याचं सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, डाॅ. श्याम कदम, सहाय्यक उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, कर्जत

श्याम कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, “घोड्यांच्या रक्ताचे नमुने आम्ही पाठवलेले आहेत. इतर घोड्यांमध्ये कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. दोनच घोड्यांना ही समस्या गंभीर प्रमाणात होती. आपण त्यांच्या सगळ्या चाचण्या केल्या. कुठलाही व्हायरस मिळाला नाही. सगळ्या रक्त चाचण्या नॉर्मल आहेत. आपल्या उपचारानंतर दोन्ही घोड्यांच्या अंधत्व पूर्णपणे कव्हर झालं आहे. सात दिवसांचा उपचार सुरू आहे. आम्हाला अंदाज वाटत होता की रक्तात परपोषी असू शकतात पण त्याचे निदान झाले नाही.

“एक घोडा 100 टक्के बरा झालेला आहे. दुसऱ्या घोड्याला 23 तारखेला सात दिवस पूर्ण होत आहेत. आम्ही 20 घोड्यांची स्क्रिनिंग केलेली आहे. त्यापैकी दोनच घोड्यांमध्ये प्रॉब्लेम आढळला. अंधत्व येतं. लक्षणांमध्ये ताप असू शकणार आहे पण ते मालकांना सुरुवातीला दिसलं नाही. दररोजचं वागणं सामान्य दिसलं नाही म्हणून त्यांनी कळवलं,” असं कदम यांनी सांगितलं.

पुढे ते सांगतात “पुढच्या दोन दिवसांत 450 घोड्यांची तपासणी केली जाणार आहे. सुरुवातीला काही 3-4 घोड्यांच्या डोळ्यांमध्ये संसर्ग झाल्याच्या तक्रारी होत्या. संसर्ग झालेल्यांना आय ड्रॉप्स दिलेले आहेत. ते व्हायरल इनफेक्शन होतं. ते घोडे आता बरे झाले आहेत. तसंच रक्ताच्या चाचण्यांचे नमुने नॉर्मल आहेत.”

परंतु व्हायरस कुठला आहे की काय कारण कळू शकलेलं नसून सात दिवसानंतर (23 सप्टेंबरनंतर) आम्ही नमुने देणार आहोत. त्यात काय आढळून येतं का पाहणार आहोत, असंही श्याम कदम यांनी स्पष्ट केलं.

‘हॉस्पिटल आहे पण डॉक्टर नाही’

घोड्यांच्या डोळ्यांचा आजार बरा झाला आहे परंतु आमची मुख्य समस्या ही माथेरानमध्ये घोड्यांसाठी पूर्णवेळ डॉक्टर नाही ही आहे, असं तुषार आखाडे सांगतात.

ते म्हणाले, “घोड्यांच्या डोळ्यांचा विषय आता बरा झालेला आहे. पण आमची मुख्य समस्या ही इथे डॉक्टर नाही आहे हीच आहे. इथे डॉक्टर नसल्याने छोटा विषय मोठा होतो. आम्ही मोठे त्रास काढले आहेत. एक वर्ष झालं डॉक्टर नाही. बाहेरच्या डॉक्टरांना अतिरिक्त पदभार दिला जातो. हजार जनावरं आहेत त्यांच्यासाठी स्पेशल डॉक्टर पाहिजे. हॉस्पिटल बांधून ठेवलं आहे. घोड्यांना इजा झाली आणि लगेच तर कोणताही छोटा विषय मोठा होतो.”

“आमचं पोट यावर भरतं. घोड्यांना काही झालं तर लगेच पर्यटनावर त्याचा परिणाम होतो. इथे डॉक्टर उपलब्ध नाही. आमच्या चार पिढ्या घोड्यांमध्ये चालल्या. घोड्याला ताप आला तर कळतं. पण बाकी काही झालं, पोटदुखी झाली काही झालं तर आम्हाला कसं कळणार? आपतकालीन परिस्थितीत इथे डॉक्टर हवेत ना. आजारी घोड्यावर ग्राहक बसणार नाहीत,” ही समस्या ते कळकळीने मांडत होते.

घोड्यांच्या डोळ्यांचा आजार बरा झाला आहे परंतु आमची मुख्य समस्या ही माथेरानमध्ये घोड्यांसाठी पूर्णवेळ डॉक्टर नाही ही आहे, असं तुषार आखाडे सांगतात.

फोटो स्रोत, डाॅ. अनिल लहाने

तर घोड्यांच्या मालक निधी जाधव यांनीही या समस्येकडे आवर्जून लक्ष वेधलं. त्या सांगतात, “माथेरानमध्ये जो दवाखाना आहे तिथे डॉक्टर उपलब्ध नाही. जूनपासून डॉक्टर नाही यामुळे हे एवढं वाढलं. इथेच आम्हाला डॉक्टर मिळाला असता तर एकच घोड्यापर्यंत थांबलं असतं. बाहेरून डॉक्टर बोलवल्यावर ते जेव्हा फ्री असतात तेव्हा येतात. आम्ही डॉक्टर द्यावा ही मागणी करत आहोत.”

यासंदर्भात आम्ही कर्जत पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनाही प्रश्न विचारला. ते म्हणाले, “इथे पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नाही. बदली झाल्यापासून पोस्टिंग नाही. साधारण जुलै 2025 पासून पोस्टिंग नाही. अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे दिलेला आहे. त्यांना पूर्णवेळ थांबायच्या सूचना दिल्या आहेत. पूर्णवेळ डॉक्टर रूजू करणं हे प्रक्रियेत आहे.” असं त्यांनी स्पष्ट केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

 

Author

  • akshay kambli
    Akshay Kambli

    मी अक्षय कांबळी, राहणार पिंपरी पुणे. सध्या पत्रकारितेच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. समाजमाध्यमातून भावना पोहचवणे मला आवडते.

    View all posts

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook

More News

  • BBC Marathi
  • Maharashtra Times
  • Zee 24 Taas
  • Pudhari
  • Saamana
  • TV9 Marathi
  • Loksatta
  • Divya Marathi Bhaskar
  • News 18 Marathi
  • ABP Majha
Made with ❤ by MyMarathi
  • BBC Marathi
  • Maharashtra Times
  • Zee 24 Taas
  • Pudhari
  • Saamana
  • TV9 Marathi
  • Loksatta
  • Divya Marathi Bhaskar
  • News 18 Marathi
  • ABP Majha