बीडच्या अंबाजोगाईत धक्कादायक घटना, बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील नागरगोजेंनी आयुष्य संपवलं

Sunil Nagargoje : बडतर्फ केलेले पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे (Sunil Nagargoje) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाईत घडली आहे. अंबाजोगाई येथील घरी सुनिल नागरगोजे हे एकटेच होते. सोमवारी रात्री त्यांनी गळफास घेत आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.
परभणीतील अधीक्षकांना शिवीगाळ प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. बदलीनंतर बीड येथे त्यांना नियंत्रण कक्षातच ठेवले गेले होते. परभणीच्या प्रकरणात एप्रिल 2025 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासून ते नैराश्यात होते. यानंतर बडतर्फ केलेले पोलीस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.   
परभणी, लातूर आणि बीडमध्ये बजावली सेवा
सुनील नागरगोजे यांचे मूळ गाव परळी तालुक्यातील नागदरा आहे. मात्र, ते अनेक वर्षांपासून कुटुंबियांसह अंबाजोगाई येथे वास्तव्यास होते. पोलीस खात्यात काम करताना त्यांनी परभणी, लातूर आणि बीड या ठिकाणी सेवा बजावली होती. लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळला होता.
परभणीत पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ केल्याचा आरोप 
परभणी येथे कार्यरत असताना एका पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच, बीड येथे बदली झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्यामुळे त्यांना बीड येथे नियंत्रण कक्षातच सीमित ठेवण्यात आले होते.
एप्रिल 2025 मध्ये सेवेतून बडतर्फ 
यानंतर परभणीतील शिस्तभंग प्रकरणात एप्रिल 2025 मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. बडतर्फीनंतर नागरगोजे हे नैराश्यात गेले होते. सध्या त्यांची मुले पुण्यात शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पत्नीही सध्या पुण्यात मुलांजवळ असल्याचे सांगितले जात आहे. अंबाजोगाई येथे नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने, नागरगोजे हे भाड्याच्या घरात एकटेच राहत होते. दरम्यान, रविवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अंबाजोगाई येथील निवासस्थानी आत्महत्या करून जीवन संपवले. 
दरम्यान, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. सुनील नागरगोजे यांनी आत्महत्या नेमकी का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुनील नागरगोजे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे.या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. 

आणखी वाचा 
Mumbai Police Notice To Manoj Jarange Patil Maratha Protest: आझाद मैदान तातडीने रिकामं करा, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना बजावली नोटीस, मराठा आंदोलनाचं काय होणार?
 

Author

Leave a Comment