Published by:
Last Updated:September 02, 2025 10:04 PM IST
मुंबईत सामान्य जीवन आणि दैनंदिन हालचालींना पुन्हा गती मिळाली असून प्रशासनानेही सुटकेचा निश्वास टाकला आहे.
Manoj Jarange Mumbai Protest
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चार दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांनी शेवटी मागण्यांवर तोडगा निघाल्यानंतर आपले आंदोलन मागे घेतले. सरकारने आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याचा शासन निर्णय (जीआर) जारी केला. या जीआरनंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले होते की, “सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याचा जीआर काढला, तर आम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई खाली करू.” त्यांच्या या वक्तव्याप्रमाणेच आंदोलनकर्त्यांनी वचन पाळत मुंबई रिकामी केल्याचे चित्र मुंबई महानगरपालिकेसमोरील रस्त्यांवर दिसत आहे.
शासन निर्णयाची प्रत हाती आल्याबरोबर अवघ्या तीन तासांत आंदोलकांनी आझाद मैदान आणि महापालिकेसमोरील परिसर सोडला. मोठ्या संख्येने आलेले मराठा बांधव आपापल्या गावी रवाना झाले. परिणामी मुंबईतील वाहतूक सुरळीत झाली असून परिसर पुन्हा पूर्ववत दिसू लागला आहे.
गाड्या गावाकडे रवाना
आझाद मैदानासह महापालिकेसमोरच्या रस्त्यांवर गेल्या काही दिवसांत आंदोलकांची गर्दी उसळली होती. अनेक ठिकाणी वाहनतळे व्यापली गेली होती. मात्र जीआर आल्यानंतर आंदोलकांनी कोणतीही गडबड न करता शांततेने आंदोलन मागे घेतले. रात्री उशिरापर्यंत आंदोलकांच्या गाड्या गावाकडे रवाना होताना दिसत होत्या. पोलिसांनीही गर्दी नियोजनबद्ध पद्धतीने बाहेर काढली.
advertisement
तीन तासातच खाली केली मुंबई
या पार्श्वभूमीवर, “मनोज जरांगे यांनी दिलेला शब्द पाळला,” असे चित्र संपूर्ण राज्याने पाहिले. त्यांनी जाहीर केले तसेच वागून आंदोलन मागे घेतल्याने त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधिकच दृढ झाल्याचे मराठा समाजातील कार्यकर्ते सांगत आहेत. मुंबईत सामान्य जीवन आणि दैनंदिन हालचालींना पुन्हा गती मिळाली असून प्रशासनानेही सुटकेचा निश्वास टाकला आहे. आंदोलकांनी दाखवलेली शिस्त आणि जरांगे यांच्या नेतृत्वाची बांधिलकी यामुळे हे आंदोलन राज्याच्या राजकीय इतिहासात आदर्श पायंडा पाडणारे ठरले आहे.
advertisement
आज काय निर्णय झाला?
जरांगेंनी विजयी गुलाल उधळला अन् आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष सुरू केला. मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. अखेर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातला शासन निर्णय काढण्यात आला. जरांगेंनी विजयाची घोषणा केल्यानंतर आझाद मैदान एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी दुमदुमलं. राज्यपालांच्या स्वाक्षरीनं हैदराबाद गॅझेटियरच्या अमंलबजावणीचा शासन निर्णय सरकारने काढला त्याचसोबत त्यांच्या इतर मागण्याही मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं… त्याचसोबत मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ तर सातारा संस्थानचं गॅझेटियर लागू करण्यासाठी 1 महिन्यांची मुदत त्यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange: आमचा रामराम घ्यावा…जरांगे पाटील जे बोलंले ते केलं, मुंबईकरांची माफी मागून 9 च्या आत शहर खाली!